मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचे खासदार कपिल पाटील हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कपिल पाटील ठाणे जिल्ह्यातील भाजपचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांनीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस प्रवेशबाबत तीन वेळा भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळताच पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देतील असं बोललं जात आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेसकडे आहे. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेल्या कपिल पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तीन वेळा भेट घेतली आहे. तसेच या भेटीत त्यांनी आगामी वाटचालीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
दरम्यान कपिल पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून 2014 साली दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी त्यांना भाजपात आणून भिवंडी मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ते लाखभर मतांनी निवडून आले होते. परंतु सध्या भाजपविरोधात वातावरण दिसत असल्यामुळे कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये जाण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना काँग्रेस उमेदवारी देणार का? हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS