मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये आता आवकजावक सुरु झाली असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी केलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. अपक्ष माणसाला काय, कुठल्याही पक्षात जाऊ शकतो. कोणत्याही नेत्याशी चर्चा करु शकतो. आपल्याला कोण विचारणारं नाही असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांचा भाजपमधील पक्षप्रवेश लांबला. त्यानंतर आता सत्तार हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS