अहमदनगर – राष्ट्रवादीच्या पुरस्कृत आमदारानं शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून ते उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नेवासाचे आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नगरला जाऊन आमदार शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नार्वेकर यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि उद्धव ठाकरे यांचे फोनवरून संभाषण घडवून आणले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गडाख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर गडाख यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे गडाख यांच्या रुपाने ती उणीव भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. शंकरराव गडाख यांनी नेवासामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबाही दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडाख यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
COMMENTS