लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप नापास, तीनही राज्यातील सत्ता गमावणार – सर्व्हे

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप नापास, तीनही राज्यातील सत्ता गमावणार – सर्व्हे

लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणारी तीन राज्यातील विधानसभा निवडणूक येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये होत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणज्येच 2013 मध्ये या तीनही राज्यात भाजपाला जबरदस्त विजय मिळाले होते. त्याच्या अगदी उलटी परिस्थिती यंदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपसाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा धक्का असू शकतो.

तीन राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये काँग्रेस अत्यंत चांगल्या मतांनी जिंकण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी तब्बल 130 जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. तर भाजपला केवळ 57 जागांवर समाधन मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 जागा मिळू शकतील. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आहे. गेहलोत यांना 39 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना केवळ 24 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे युवक नेते सचिन पाटलट यांना केवळ 18 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे.

छत्तिसगडमध्येही काँग्रेसला मोठा विजय मिळण्याची शक्यता सर्व्हेमध्ये वर्तविण्यात येत आहे. छत्तिसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी 54 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 33 जागा मिळण्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांना 3 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीत मात्र फारसा फरक दिसत नाही. काँग्रेसला 40 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. तर भाजपला 39 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मात्र भाजपचे रमणसिंग यांनाच सर्वाधिक पसंती आहे. रमणसिंग यांना 34 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर काँग्रेसमधून बाहेर पडलेले अजित जोगी यांना 17 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मध्यप्रदेशातही काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी जागांमध्ये फारसा फरक दाखवण्यात आलेला नाही. 230 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला 117 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 106 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 7 जागा मिळू शकतात. इथेही मुख्यमंत्री म्हणून विद्यमाना मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. चौहान यांना तब्बल 42 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. तर काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना 30 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना केवळ 7 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मतांच्या टक्केवारीतही दोन्ही पक्षात फारसा फरक नाही. भाजपला 40 तर काँग्रेसला 42 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवल्याचं सर्व्हे सांगतो. तर इतरांच्या खात्यात 18 टक्के मतं जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS