आज विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार

आज विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात बारा दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यास देशभरातील शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांचा पठिंबा मिळत असल्याने शेतकरी प्रश्नावर राजकारण तापले आहे. या कायद्याविरोधात आज शरद पवार, राहुल गांधी यांच्या सोबत विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याबाबत सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की विरोधी पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

सीताराम येचुरी म्हणाले की, “या प्रतिनिधी मंडळात राहुल गांधी, शरद पवार यांच्यासहित इतर विरोधी पक्षाचे नेते सामिल होणार आहेत. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींना केवळ पाच लोकांना भेटायची अनुमती आहे.” शरद पवार यांनी सांगितलं की, “राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी ते विविध राजकीय पक्षांशी या कायद्यांच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.” शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. पण ती भेट कृषी कायद्यासंदर्भात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या तेरा दिवसांपासून दिल्लीच्या सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या मुद्द्यावरुन शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या पाच फेऱ्याही झाल्या आहेत पण कोंडी काही फुटली नाही. हा कायदा पूर्णपणे मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. सरकारच्या या नव्या कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी भारत बंदचेही आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, टीएमसी आणि समाजवादी पक्षासह इतर अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी  शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याने महाराष्ट्रात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्योग वगळता आस्थापने, बाजारपेठा बंद होत्या. अनेक ठिकाणी निदर्शने,  रास्ता रोको करण्यात आले.

COMMENTS