विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांचा गोंधळ !

विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांचा गोंधळ !

मुंबई – विधानसभेत राज्यातील पाण्याच्या प्रश्नावरुन आज विरोधकांचा गोंधळ पहायला मिळाला. तारांकित प्रश्नावर चर्चा सुरु असताना विदर्भ – मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र धरणं आटली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबात नियोजन झाले नाही. उजनी धरण १००% भरले तरी -५७% खाली गेलं आहे. नियोजनाचा सावळा गोंधळ निर्माण झाला असून खडकवासला, टेमघर या धरणातही पाणी कमी आहे, त्यामुळे या परिसराला पाणी मिळत नाही. याला कोण जबाबदार आहे त्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी अजित पवारांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचन प्रकल्पांना निधी वितरित केला आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार असल्याचं  गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच  उजनी धरण शंभर टक्के भरलं होतं हे खरं आहे. कालवा सल्लागार समितीने नियोजन करूनच पाणी सोडलं आहे. शेतकरी खूश आहेत, मुबलक पाणी आम्ही त्यांना देतोय. ढिसाळ नियोजन आहे हा आरोप चुकीचा आहे असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उजनी धरणातून पाणी सोलापूरला मिळत नाही. सोलापूरला 8 दिवसांनी पाणी येत असल्याची तक्रार यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. यावर विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूरला अर्धा टीएमसी पाणी सोडायला 8 टीएमसी पाणी वाया घालवू का? असा सवाल केला. एकंदरीतच पाणी प्रश्नावरुन आज विधानसभेत चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली.

COMMENTS