उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा निसटसा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद विधानसभेची जागा खेचून आणली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 10 हजार मतांनी विजयश्री मिळवली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मताधिक्य राहिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभेसाठी अनेकांना स्वप्न पडू लागले आहेत.
यामध्ये शिवसेनेच्या तब्बल 23 इच्छुकांनी मातोश्रीवर जाऊन उमेदवारी मागितली आहे. यामध्ये उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, संजय पाटील दुधगावकर, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, शिवसेनेची राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, उस्मानाबादचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे, अजित पिंगळे, बालाजी जाधवर आधी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान काही ठराविक इच्छुक सोडले तर इतर इच्छुकांनी कधी ग्रामपंचायतही लढविली नाही. काही इच्छुक वरिष्ठ स्तरावर काम करीत आहेत, अशांनी उमेदवारी मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षश्रेष्ठी येथील कोण- कोणाला उमेदवारी देतात की उमेद्वारीवरून मतदारसंघात संघर्ष पेटतो? याकडे येथील शिवसैनिकांच्या नजरा असणार आहेत.
COMMENTS