उस्मानाबाद – राज्यात युती आणि आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला चारही प्रमुख पक्ष सामोरे जात आहेत. विधानसभेच्या पूर्वसंध्येला युतीतील प्रमुखांनी आघाडीची मोडतोड करीत अनेक मातब्बर नेते स्वतःच्या पक्षात खेचून घेतले. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या फुटक्या आघाडीत चांगलेच मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही हे पाहायला मिळत आहे. मात्र युतीमध्ये चांगलाच बेबनाव असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. एकमेकांना सहकार्य करण्याच्या ऐवजी शिवसेना भाजपा खेचाखेची करीत असल्याचे पाहायला मिळते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा तुळजापूर मध्ये झाली. जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याशिवाय सेनेचा एकही पदाधिकारी या सभेला हजर राहिला नाही. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा उस्मानाबाद शहरात झाली. ॲडव्होकेट मिलिंद पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशिवाय भाजपचा एकही नेता अथवा कार्यकर्ता ठाकरे यांच्या सभेला हजर नव्हता. त्यामुळे येथे चांगलाच बेबनाव असल्याची चर्चा होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोनच दिवसात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाटील यांच्यावर चौफेर टीका केली.
पाटील भाजपवाशी झाल्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांना ही टीका जिव्हारी लागली. पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षनी ओमराजे यांना प्रतिआव्हान दिले. त्यानंतर खासदार राजे निंबाळकर यांचा पारा थोडा उतरला. दरम्यान प्रचारात मात्र एकमेकांची तोंडे न पाहण्याची जणू शपथच भाजप सेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे चित्र उस्मानाबाद, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. तुळजापुर मधील भाजपचे उमेदवार राणा पाटील यांच्या प्रचाराला शिवसेनेचा एकही प्रमुख नेता फिरकला नाही.
तर उस्मानाबाद येथील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराला जिल्ह्यातील भाजपचा एकही नेता पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे युतीतील हा बेबनाव जिल्ह्यातील युतीच्या जागा वाढविणार की घटविणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. राणा पाटील भाजप मध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी फूट पडली तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षसह अनेकांना गळाला लावत सेनेने आपला गड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत उरलेले आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मात्र एकोप्याने काम करताना दिसत आहेत. त्यामुळे युतीतील बेबनाव आणि फुटक्या आघाडीतील मनोमिलन कोणाला मारक? कोणाला तारक ठरणार हे येत्या 24 तारखेला पाहायला मिळणार आहे.
COMMENTS