उस्मानाबाद लोकसभेसाठी साहेब, दादा, भैया, ताईंच्या नावांची चर्चा !

उस्मानाबाद लोकसभेसाठी साहेब, दादा, भैया, ताईंच्या नावांची चर्चा !

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. उस्मानाबाद लोकसभेत परंडा, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा व औसा या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. याशिवाय निलंगा तालुक्यातील 40 गावांचाही समावेश आहे. अशा विस्तीर्ण पसरलेल्या लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच बाजूने चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात खरी लढाई होईल. शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना तिकीट मिळणार की नव्याने नवखा उमेदवार देणार, याची उत्सुकता आहे.

गायकवाड यांची पाच वर्षांची कारकिर्दी फारसी चांगली राहिली नाही. खासदार गायकवाड यांना नागरिकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले होते. त्यातील अनेक कामे मार्गी लावण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. वरीष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्याशिवाय त्यांनी फारसे काही करून दाखविले नाही. विमानासंबंधी वाद निर्माण करून त्यांनी वेगळी ओळख केली खरी, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे सर्व काही असूनही त्यांनी जनसंकर्ख खूपच कमी ठेवलेला आहे. मतदारसंघाचे दौरे केले नाहीत. त्या-त्या भागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातच त्यांच्या चुकीमुळे जिल्हा परिषदेतील सेनेची सत्ताही गेल्याची चर्चा  पक्षातील सेनेच्या गोटात होत आहे.

पक्षाने यापूर्वी त्यांना आमदारकी, खासदारकी दिली आहे. आता पक्षाच्या कार्यसाठी त्यांनी काम करावे,  शिवाय पुत्र किरण गायकवाड यांच्यासाठी काम करावे.  असा सल्ला त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे शिवसेनेकडून नवखा उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा आहे. माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांनी विधानसभा मतदारसंघात गेली साडेतीन वर्षे संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांना आमदारकीचं काहीस अवघड आहे. खासदारकीसाठी मात्र त्यांना जिल्ह्यातील वातावरण पोषख ठरू शकते. जिल्ह्यातील शिसेनेच्या तसेच काँग्रेस नेत्यांच्या जवळकीचा फायदा त्यांना मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्या नावाला प्राधान्य मिळू शकते. त्यामुळे ओमप्रकाश राजेनिंबाळकर (दादा) यांचाही नंबर लागू शकतो.

याशिवाय शिवसेनेकडून प्रतापसिंह पाटील (भैया) यांचा नंबर लागू शकतो. गेल्या वर्षभरापासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. नवख्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. शिवाय जुन्या कार्यकर्त्यांनाही ते सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे बंधू परभणीचे आमदार राहुल पाटील यांचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. याचा फायदा त्यांच्या तिकीटासाठी होऊ शकतो. उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्याशिही भैयांना जूळवून घ्यावे लागणार आहे. याशिवाय ऐनवेळी शंकरराव बोरकर यांचेही नाव चर्चेत येऊ शकते. पण, गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार प्रा. सावंत यांच्यासोबत ताणलेले संबंध बोरकरांच्या उमेदवारीसाठी अडथळा ठरू शकतो. पण, बोरकरांच्या जूळवून घेण्याच्या स्वभावामुळे त्यांचाही खासदारकीसाठी नंबर लागू शकतो.

लोकसभेसाठी युती नाही झाली तर भाजपकडून रुपाताई निलंगेकर यांचे नाव पुढे येऊ शकतो. त्यांच्या नावाला विरोध होण्याचे कोणतेही कारण असणार नाही. पण, त्यांचे नाव चर्चेत न राहिल्यास सुधीर पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण,  दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्या प्रतापसिंह पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देणार की अॅड. मिलींद पाटील यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन न्याय देणार, याची उत्सुकता भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. ऐनवेळी प्रतापसिंह (भैया) पाटील यांचेही नाव भाजपकडून पुढे येऊ शकते.

राष्ट्रवादीकडून डॉ. प्रद्मसिंह पाटील यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. वाढत्या वयोमानामुळे ते उमेदवारी घेणार का, याबाबत अनिश्चितता असली तरी त्यांच्या ऐवजी त्यांच्या सूनबाई अर्चनाताई (ताई) पाटील यांचे नाव दुसऱ्या नंबरवर येऊ शकते. जिल्हा परिषदेच्या त्या उपाध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क वाढविला आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचेही नाव चर्चेत असले तरी त्यांनी मात्र खासदारकी लढविण्यासाठी नकार दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल मोटे यांचेही नाव चर्चेत येत आहे. त्यांना उमेदवारी दिली तर काँग्रेससह राष्ट्रवादीचीही चांगली मते त्यांना मिळू शकतात. शिवाय विधानसभेत आघाडीची सत्ता आली तर जिल्ह्यातील पक्षाचा प्रतिस्पर्धी मंत्रीपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी मोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू शकते. त्यामुळे राहुल (भैया) यांचाही बोलबाला या चर्चेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे.

COMMENTS