उस्मानाबाद – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं असलं तरी जिल्ह्यामध्ये मात्र महािकास आघाडीत चांगलीच बिघाडी झाल्याचं चित्र आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात 3 पंचायत समित्या आहेत. या तिन्ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. 3 पंचायत समितीत राष्ट्रवादीचे सभापती आहेत. मात्र महाआघाडीत असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीला या तिन्ही तालुक्यांमध्ये पुरते घायाळ केले आहे.
येत्या 31 डिसेंबरला नव्याने सभापती निवडीची प्रक्रिया होत आहे. मात्र तिन्ही ठिकाणी शिवसेनेचे बडे नेते आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. त्यामुळे यातिन्ही पंचायत समिती मधील राष्ट्रवादीची सत्ता जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेने तगडी फिल्डिंग लावली असून तिन्ही पंचायत समितीत वर्चस्व मिळविण्यासाठी फोडाफोडी करीत राष्ट्रवादीला हादरा देण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. वाशी पंचायत समिती मध्ये एकूण सहा सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या भाग्यश्री हाके या ओबीसी असल्याने सभापतीपद त्यांच्याकडे गेले. आता मात्र शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत येथील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भूम पंचायत समितीमध्ये एकूण दहा सदस्य आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचा एक, भाजपचा एक व सेनेचे तीन सदस्य आहेत. सहाजिकच या ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती असून भुम पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे पाचपैकी दोन सदस्य हे सेनेत जाणार असल्याची चर्चा असून काँग्रेसचे एक सदस्य यापूर्वीच शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे सेनेचे बळ दहापैकी सहा पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या ठिकाणीही राष्ट्रवादीला हादरा बसल्याचे चित्र आहे.
परंडा पंचायत समितीमध्ये एकूण दहा सदस्य आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे सात, शिवसेनेचे दोन आणि भाजपचा एक सदस्य असे बलाबल आहे.
दरम्यान असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार सदस्य सेनेसोबत सहलीला गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी सेनेची सत्ता येण्याची संकेत मिळत आहेत. या तिन्ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्याच या गडाला हादरा देत शिवसेनेने येथे आपला भगवा फडकवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीमध्ये चांगलीच बिघाडी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान याचे परिणाम आता वरिष्ठ पातळीवर होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणामी प्राध्यापक सावंत यांना मंत्रिमंडळातून स्थान मिळणार की नाही याचीही चर्चा जिल्ह्यात याच कारणावरून होऊ लागली आहे.
COMMENTS