उस्मानाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आज मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. उस्मानाबादमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यावेळी 286 कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन जिल्हाधिकारी कार्यालायासमोर गुरुवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शहर बंद ठेवले. नागरिकांनीही याला उत्स्फुर्त प्रतिसाद देत बहुतांश दुकाने बंद ठेवली होती.
दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेकडो कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी ठिय्या मांडला आहे. शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यासंह इतरांचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर घेतले. ठिय्या मांडत त्याशेजारीच सुमारे 286 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. शिवाय मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. ठिय्या आंदोलनात सहभाग घेत मराठा तसेच मुस्लिम आरक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे सर्व आंदोलन शांततेत पार पडले.
COMMENTS