उस्मानाबाद – शिवसेना नेते तथा विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या भूमिकेमुळे उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची चांगलीच गोची झाली आहे. एकीकडे आड अन दुसरीकडे विहिर अशी अवस्था झाल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे.
दरम्यान प्रा. खासदार गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर खरी विचित्र अवस्था झाली आहे ती आमदार चौगुले यांची. आमदार चौगुले प्रा. गायकवाड यांचे सामान्य कार्यकर्ते. एक प्रामाणिक आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. सलग दोन पंचवार्षिकमध्ये त्यांना विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. काही तुरळक घटना वगळता सर्व काही सुस्थितीत होते. मात्र खासदार प्रा. गायकवाड यांचे तिकीट कापण्यात आले. दरम्यान प्रा. गायकवाड यांचे तिकीट कापण्याची कारणे आमदार चौगुले जाणून होते. मात्र बोलून दाखविणे तसे अवघडच होते. त्यांनी खासदार प्रा. गायवाड यांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. तिकीट कापल्याने प्रा. गायकवाड यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.
स्वतःहोऊन कोणत्याही मतदारसंघात फिरकत नाहीत. त्यामुळे आमदार चौगुले यांनाही मतदारसंघात फिरकता येईना झाले आहे. येत्या सहा महिन्यात विधानसभा
निवडणुका आहेत. मात्र आता जर स्वतःच्या विधानसभा निवडणुकीत फिरकले नाहीत, तर सेनेतील दुसरा गट म्हणजे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर नाराज होत
आहेत. प्रत्येक मतदार हा प्रा. गायकवाड यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करणारा नसतो. त्यामुळे कट्टर शिवसैनिक याची शिक्षा देऊ शकतो. अथवा असे
मतदार आमदार चौगुले यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मतदारसंघात फिरणे अनिवार्य आहे. मात्र आपले गुरु खासदार प्रा. गायकवाड
मतदारसंघात फिरकत नसल्याने त्यांच्या विरोधातही भूमिका घेता येत नाही. जर त्यांच्याविरोधात जावून मैदानात उतरावे, तर प्रा. गाकवाड यांच्या नाराजीचा फटका आगामी विधानसभेत बसू शकतो हे चौगुले जाणून आहेत. लोकसभेत आपला मतदारसंघ जर निवडणुकीत पिछाडीवर गेला (मायनस) तर पक्षाचाही दट्या मागे लागू शकतो. शिवाय मतदारांची मानसिकताही बदलू शकते. विधानसभेचे चित्र अवघड बनू शकते, अशी भिती आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरकावे तर अवघड अन नाही फिरकावे तरीही अवघड असल्याचे सध्या तरी चित्र आमदार चौगुले यांच्यासाठी दिसत आहे. एकूण या सर्व प्रकरणात आमदार चौगुले यांची चांगलीच गोची झाली आहे.
COMMENTS