उस्मानाबाद- जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत दुरावा कमी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थसंकल्पीय
सर्वसाधारण सभेनंतर दोन्ही काँग्रेसने एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन एकोप्याचे दर्शन घडविल्याने 2019 च्या पूर्वीचे मनोमीलन असल्याचे संकेत दिले जात आहेत. गेल्या 15 वर्षात जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहेत. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये काँग्रेसने सेनेला सोबत घेत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले.
दरमम्यान यापूर्वी जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचे अनेक वेळा मनोमीलन झाले. मात्र त्यामध्ये दोन्ही पक्ष मनाने कधीही एकत्र आले नाहीत. दरम्यान जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये अर्थसंकल्प सादर झाला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही अर्थसंकल्पाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे विरोधकांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. प्रत्येक सभेत एकमेकांचे वाभाडे काढण्यापासून धावून जाण्यापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांची मजल जात होती. पण, सर्वसाधारण सभेत एकोप्याचे दर्शन झाले. विशेष म्हणजे त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पत्रकार परिषदेला हजेरी लावत मनोमीलनाचे संकेत दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत चर्चीली जात आहे. आता हे मनोमीलन आगामी लोकसभा, विधानसभेपर्यंत टीकणार की केवळ अर्थसंकल्पापुरतेच मर्यादीत राहणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
COMMENTS