उस्मानाबाद – आघाडी आणि युतीच्या राजकीय आखाड्यावर रुसवे फुगवे, पत्रकार प्रताप शेळकेंचा कानोसा !

उस्मानाबाद – आघाडी आणि युतीच्या राजकीय आखाड्यावर रुसवे फुगवे, पत्रकार प्रताप शेळकेंचा कानोसा !

उस्मानाबाद, (प्रताप शेळके) – आघाडी आणि युतीच्या राजकीय आखाड्यावर रुसवे फुगवे सुरू आहेत. एकमेकांना शह कट शह दिले जात आहे. यात कुनाची फरफहट होतेय तर कुणाच्या उकळ्या पाकळ्या फुटत आहेत. आशा स्थितीत कोण किती पाण्यात आहे. याचा घातलेला कानोसा. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच घमेंडीपणा होता. दारुण पराभवामुळे दोन्ही काँग्रेसमधील घमेंड चांगलीच उतरल्याचे चित्र आगामी २०१९ च्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. अन्यथा दोन्ही काँग्रेसमधील वाचाळवीर एकमेकांवर टीका करण्यात कायमच मशहूर

असायचे. आता मात्र दोन्ही काँग्रेसने चांगलेच जुळवून घेतल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा होणाऱ्या निवडणुकीत ५० टक्केतरी फरक पडल्याचे दिसत आहे. भाजप आणि सेनेतील चित्र मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत विरुद्ध चित्र असल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि सेना गेल्या निवडणुकीत युती करून लढल्याने राज्यातील ४८ पैकी ४२ जागा युतीच्या पदरात पडल्या. यामध्ये भाजपला २४ तर सेनेला १८ जागावर विजय मिळाला.

दरम्यान यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेत निवडणुकीच्या पुर्वसंधेला कडवा संघर्ष पाहायला मिळत आहे. पाच वर्षात भाजपने सेनेला सवतीच्या लेकरासारखी वागणूक दिल्याने सहाजिकच सेनेचा वाघ निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच गुरगुरु लागला आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच हवा टाईट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान अशा स्थितीत आघाडी झाली अन भाजप आणि सेना वेगळे लढली तर कसे चित्र असेल, याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहे.

भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये (म्हणजे २०१४ मध्ये) केवळ विकासाचा मुद्दा पुढे केला. सामाजिक मुद्याला फारसा वाव दिला नाही. त्यामुळे ओबीसी वर्ग तसेच मराठा वर्ग भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र होते. त्यापूर्वी हा वर्ग राष्ट्रवादीच्या बाजूने होता. विशेषतः मराठा वर्ग जो पूर्वी राष्ट्रवादीचा होता, तो २०१४ मध्ये पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकला होता.

तर ओबीसी वर्ग जो काँग्रेसचा होता, तोही भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र गेल्या पंचवार्षिकमध्ये होते. या दोन्ही वर्गाला विकासाची आस लागली होती. तर काँग्रेसच्या बाजूने असलेला मुस्लिम वर्गही एमआयएम पुढे नतमस्तक झाला होता.

पाच वर्षानंतर…..

दरम्यान पाच वर्षे भाजपने सत्तेची मजा घेतली. विकासाचा जो प्रमुख मुद्दा होता, त्याकडे मात्र भाजपने फारसे लक्ष दिले नाही. नितीन गडकरी यांचा बांधकाम विभाग सोडला तर देशात फारसा काही बदल झालेला दिसत नाही. उलट नोटाबंदीच्या प्रकरणाने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. २ कोटी रोजगाराची

घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. उलट अनेकांचे आहे, तेव्हडे रोजगार राहिले नाहीत. त्यामुळे विकासाची घोषणा वास्तवात दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक प्रश्नाकडे वळण्याच्या मार्गावर आहे. त्यातील राम मंदिर उभारणीचा मुद्दा आहे. विकास होईल, याच हेतूने भाजपला अनेकांनी भरभऱून मदत केली आहे. आता राम मंदिराचा मुद्दा घेऊन मैदानात येण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. सोबतच सामाजिक

१० टक्के आरक्षण देऊन काहीतरी मते आपल्या बाजूने वळविण्याचा  प्रयत्न केला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात मतदार हा भाजपपासून दुरावला आहे. तो पुन्हा काँग्रेसच्या बाजूने सरकेल असाच काहीसा अंदाज दिसत आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचाही मोठा फायदा दिसत आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र लढत असल्याने भाजपची चांगलीच गोची होताना दिसत आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात मुस्लिम, दलितांवर झालेल्या अत्याचारावरून एमआयएमकडे वळलेला मतदारालाही काहीतरी चुकल्यासारखे वाटत असल्याने पुन्हा काँग्रेसकडे झुकल्याचे नुकत्याच चार राज्यात झालेल्या निवडणुकीवरून दिसून येत आहे.गेल्या चार-पाच निवडणुकीत शिवसेनेचा मतदार मात्र फारसा इकडे-तिकडे झालेला

दिसत नाही. तो कायमच सेनेच्या बाजूने असतो. त्यामुळेच सेनेचे विधानसभेतीलबळही कायम ४० ते ७० आकड्याभोवताली खेळून राहत आहे. त्यामुळे युती नाही झाली तर सेनेच्या ऐवजी भाजपचेच जास्त नुकसान होणार आहे. नाही तरी सेनेला लोकसभेत ४ खासदार निवडूण आले काय, अन २४ आले काय. केंद्रात सत्ता मिळविणे

हा सेनेचा हेतू नसावा. त्यामुळेच सेनेचा वाघ सध्या मोठ्या प्रमाणात डरकाळ्या फोडत असल्याचे चित्र आहे. संघर्ष हा अजेंडा घेऊन सेनेचा एक संघटना म्हणून जन्म झाला. साहजिकच बालवयातील संस्कार सेनेत

अजूनही कायम आहेत. अशा राजकीय आखाड्यात यंदा होणाऱ्या निवडणुकीत सर्वात फटका भाजपला बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत. अर्थात भाजपमधील अनेक जाणकार कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलून दाखवितआहेत.

शेवटी आगामी काळच काय ते ठरवेल. पण, सध्यातरी असेच काहीसे चित्र दिसत आहे.

COMMENTS