उस्मानाबाद – जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सोशल इंजिनिअरिंगची जोरदार चर्चा!

उस्मानाबाद – जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सोशल इंजिनिअरिंगची जोरदार चर्चा!

उस्मानाबाद – राज्यात वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या भूमिकेने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीने चांगलाच धसका घेतला आहे. जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीच्या सोशल इंजिनिअरिंगची चांगलीच चर्चा होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी एका ठिकाणी मराठा, दुसऱ्या ठिकाणी धनगर, तिसऱ्या ठिकाणी मुस्लिम तर चौथ्या ठिकाणी अनुसूचित जातीमधील उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे.

तुळजापूर मतदारसंघातून एका मराठा समाजातील महेंद्र धुरगुडे इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मुस्लिम आणि अनुसूचित जातीमधील मतदारांचे धुरगुडेंचे चांगले संबध आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून सदस्य म्हणून ते काम करीत आहेत. त्यामुळेच महेंद्र धुरगुडे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मुस्लिम तसेच दलित वर्गाची मते मिळतील. शिवाय मराठा समाजातील मतेही धुरगुडे खेचू शकतात. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जाते.

उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे तेथून एका अनुसूचित जातीच्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. तर उस्मानाबाद मतदारसंघात मुस्लिम वर्गाचे मतदार मोठ्या संख्येने आहे. शिवाय दलित वर्गाची मतेही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने येतील अशी अपेक्षा ठेवली जात आहे. त्यामुळे येथे मुस्लिम उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. परंडा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या इच्छुकाला प्राधान्य दिले जाणार आहे. चार वेगवेगळ्या मतदारसंघात सर्वच जातींना स्थान दिल्याने वंचित बहुजन आघाडीकडे या चारही जातीतील मतदार आकर्षित होईल, अशी अपेक्षा असल्याने आघाडीच्या सोशल इंजिनिअरिंगची चांगलीच चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे.

COMMENTS