पालघर पोटनिवडणुकीबाबत भाजपचं ठरलं, 10 मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार !

पालघर पोटनिवडणुकीबाबत भाजपचं ठरलं, 10 मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार !

मुंबई – पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यासाठी भाजपनंही हालचाली सुरु केल्या असल्याचं दिसून येत आहे.  याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये 10 मे रोजी भाजपचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं ठरवण्यात आलं असून जो उमेदवार द्याल तो निवडून आणू असा ठराव पदाधिकाऱ्यांनी एकमताने केला आहे. तसेच  उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याठिकाणी नेमकं कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या या खेळीने भाजप मात्र संभ्रमात पडले असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.
दरम्यान, भाजप आता नेमका काय निर्णय घेणार आणि कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS