पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. भालके यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाते की अन्य पर्याय शोधले जातात याबाबत उत्सुकता लागली आहे. विरोधात उमेदवार कोण असणार याबाबतची अजूनतरी स्पष्टता नाही. दोन्ही बाजूनी उमेदवारीबाबत कोणतेच संकेत मिळत नसल्यामुळे आता कोण कोणाकडून लढणार याची उत्सुकता लागली आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित असलेल्या माजी खासदार मुन्ना महाडिक यांनी भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपण याबाबत सध्या काहीच बोलणार नाही असं सांगितलं. मात्र आपण पंढरपूर मतदारसंघाचं पालकत्व स्विकारु असं सांगत या निवडणुकीत जातीन लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत.
भगिरथ भालके हे विठ्ठल कारखान्याचे संचालक आहेत. ते लढण्यास इच्छुक आहेत की नाही हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यांनी लढण्यास इच्छा व्यक्त केली तर तेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात. उमेदावारी देताना भावनेचं राजकारण, निवडूण येण्याची क्षमता याचाही राष्ट्रवादीला विचार करावा लागणार आहे. भालके यांचे समर्थक आणि पक्षातील स्थानिक नेत्यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत अजून एक ते दीड वर्ष आहे. त्यामुळे ते रिंगणात उतरतात का ते पहावं लागेल. लढले तर कोणत्या पक्षाकडून लढणार याचीही उत्सुकता आहे. ते मुळचे राष्ट्रवादीचे आहेत. आजही त्यांचे राष्ट्रवादीची चांगले संबध आहेत. स्थानिक राजकारण, सहकारी संस्था चालवण्यासाठी राज्यातील सत्तेचं कवच हे महत्वाचं असतं. त्यामुळे परिचारक काय निर्णय घेतील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मंगळवेढ्यातील समाधान अवताडे हेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्योजक असलेल्या अवताडे यांनी गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांना 42 हजार मते मिळाली होती. 2014 मध्ये अवताडे शिवसेनेकडून लढले होते. त्याही निवडणूक त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तेही राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात असा कयास बांधला जात आहे.
एकमात्र नक्की आहे. भालके यांच्या कुटुंबात राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. एक राष्ट्रवादीकडून लढेल तर दुसरे भाजपकडून लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
COMMENTS