मुंबई – मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याने सहायक कृषी अधिकारी पदासाठी 2013 मध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. कृषिमंत्र्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी अविनाश शेटे यांला दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयात आपल्या दालनात बोलावून घेतले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अविनाश सोबत त्याचे वडील देखील उपस्थित होते.
अविनाशची कैफियत ऐकूण घेतल्यानंतर कृषिमंत्र्यांनी कृषी आयुक्तालयाला दूरध्वनीवरून सूचना देत याप्रकरणाची फाईल सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले. अविनाशला वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय मागण्यासाठी आत्महत्या हा काही मार्ग होऊ शकत नाही. असा राग डोक्यात घालू नकोस, तुला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू जीव लाखमोलाचा आहे, अशा शब्दात त्याची समजूत काढली. अविनाशच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये त्याने दिलेल्या सहायक कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले. यावेळी दिलेल्या पेपरची फेरतपासणी करावी अशी मागणी त्याने केली. त्यानुसार त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे कृषिमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
COMMENTS