पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

मुंबई –  भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण कालच्या फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब झालं असल्याचं चित्र आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसेच त्या शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

Take a look at Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde): https://twitter.com/Pankajamunde?s=09

दरम्यान पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस आहे. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. ‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या…

Posted by Pankaja Gopinath Munde on Saturday, November 30, 2019

COMMENTS