औरंगाबाद – राज्यात महाविकासआघाडीनं सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपमधील अनेक नेते पक्षावर नाराज असल्याचं समोर आलं. त्यामुळे या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपने विविध विभागात आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे. आज औरंगाबादेत येथे मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते उपस्थित आहेत. परंतु या बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: पंकजा मुंडे या बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांची तब्येत ठीक नसून त्यांनी माझी परवानगी घेतली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे या बैठकीला येणं अपेक्षित आहे, आणि त्या येतीलही, असा विश्वास सकाळीच हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केला होता. परंतु पंकजा मुंडे या बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
COMMENTS