बीड – जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून त्यांनी सुरुवात केली असून गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत. परळीत भावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणूक लढवता येऊ शकते, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे नेहेमीच सांगत असत दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणं याठिकाणी अशक्य असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
गांव तिथे विकास दौरा अंतर्गत हाळम ता परळी येथे शालेय विद्यार्थ्यींनी अत्यंत उत्स्फूर्त स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने हाळम येथे मंजूर केलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन केले तसेच ग्रामविकास विभागाच्या २५१५ निधी अंतर्गत सभामंडपाचे लोकार्पण केले pic.twitter.com/ZtDNNCtVwx
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) April 2, 2018
दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः मतदारांनीच हा वचपा काढला असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचं आव्हान आहे. त्यातच आता शिवसेनेनेही परळीतून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने यावेळची निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात आतापासूनच मतदारांपर्यंत पोहचून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS