‘हा’ बदल फक्त महिलाच घडवू शकते – पंकजा मुंडे

‘हा’ बदल फक्त महिलाच घडवू शकते – पंकजा मुंडे

बीड, गेवराई – चक्रधर स्वामींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र पांचाळेश्वर तसेच शनिदेवाचे शक्तीपीठ असलेल्या राक्षसभुवन या दोन्ही तीर्थक्षेत्राला ‘ ब ‘ दर्जा देवून विकास करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत अशी ग्वाही देत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना दिलेला जनसेवेचा शब्द पूर्ण करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज असल्याचे प्रतिपादन येथे केले.

महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवीश्वर कुलाचार्य दर्यापूरकर बाबा तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, जि. प. चे समाजकल्याण सभापती संतोष हंगे, युध्दजित पंडित, उध्दव दरेकर, आचार्य बाभूळगांवकर, महंत कृष्णराज बाबा, महमंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, महंत मल्लेबाबा आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, चक्रधर स्वामींनी समाजाला सत्य, अहिंसा आणि समतेचा संदेश दिला त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करण्याची समाजाला खरी गरज आहे. आजच्या राजकारण्यांना सत्संगाची आवश्यकता आहे, राजकारणात आल्यापासून मला सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमातून सत्संग घडत असून त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. जातीपातीच्या भिंती बाजूला सारून प्रत्येकांमध्ये माणूस म्हणून बघितले गेले पाहिजे आणि हा बदल महिलाच घडवू शकते असे मी ठामपणे सांगू शकते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या पश्चात मला धनसंचय नाही तर जनसंचयाची ठेव ठेवली आहे, ती जपण्यासाठी मी सध्या अहोरात्र कष्ट घेत आहे. शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, वंचित व पिडीत घटकांसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांना दिलेला जनसेवेचा शब्द पूर्ण करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत, चांगले करणारांच्या बाजूने राहिल्यास चांगलेच होते असे त्या म्हणाल्या. पांचाळेश्वर व राक्षसभुवन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देवून विकास करू तसे करता नाही आले तर मुलभूत विकास योजनेतून भरीव निधी देवू असे सांगून तुम्हाला दिलेला शब्द पुर्ण करूनच पुढील वर्षी मी कार्यक्रमास येईन अशी ग्वाही त्यांनी दिली.

 पंकजाताई म्हणजे बाप से बेटी सवाई

यावेळी बोलताना जनार्दन हरिजी महाराज व बाभूळगांवकर शास्त्री यांनी पंकजाताई मुंडे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. बाप से बेटा सवाई असे म्हटले जाते परंतु पंकजाताईच्या कामाचा झपाटा व त्यांची समाजातील सर्व घटकांसाठी सुरू असलेली धडपड पाहून बाप से बेटा नाही तर बेटी सवाई झाली आहे असे जनार्दन हरिजी म्हणाले तर पंकजाताईच्या शब्दाला तलवारीची धार आहे, त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे बाभूळगांवकर महाराज यावेळी म्हणाले.

 गर्दी आणि सत्काराने वातावरण भारावले

गेवराई हून पांचाळेश्वर कडे जातांना रस्त्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी वाहनांचा ताफा थांबवून ना. पंकजाताई मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले तर युवा कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. स्वागतासाठी गांवोगांवी झालेली प्रचंड गर्दी आणि सत्काराने वातावरण भारावून गेले होते. सत्कारासाठी भाजपच्या कार्यकर्त्यां सोबतच शिवसैनिकांनही सरसावले होते. पांचाळेश्वर व राक्षसभुवन या दोन्ही ठिकाणी मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतले व भरपूर पाऊस पडो आणि माझा बळीराजा सुखी कर अशी प्रार्थना त्यांनी य केली. संयोजकांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS