बीड – ग्राम सडक योजनेच्या ५४ कोटींच्या कामांचे धारूरमध्ये डिजीटल भूमिपूजन !

बीड – ग्राम सडक योजनेच्या ५४ कोटींच्या कामांचे धारूरमध्ये डिजीटल भूमिपूजन !

धारूर – मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्हयात वेगाने सुरू असलेल्या कामांमुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलत असून ही योजना जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरली आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. धारूर व वडवणी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणा-या ५४ कोटी रुपयांच्या रस्त्याचे डिजिटल भूमिपूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज धारूर येथे मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास खासदार डॉ.प्रितम मुंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार आर टी देशमुख, आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, रमेश पोकळे, रमेश आडसकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युध्दाजित पंडित, कल्याण आकडे, स्वरुपसिंह हजारे, मंगलताई मुंडे, राजाभाऊ मुंडे, बाळासाहेब दोडतले उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत.याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची १३८४ कि.मी लांबीची जवळपास ३५० कामे मंजूर करण्यात आली असून यासाठी जवळपास ७८१ कोटी रुपयाचा निधी लागणार आहे.  यातील  कांही कामे पुर्ण झाली असून कांही कामे प्रगतीपथावर आहेत.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची धारुर तालुक्यातील ५६ किलोमीटरच्या मंजूर असलेल्या ८ कामासाठी जवळपास ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर वडवणी तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या  १९ कामासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. जिल्हयातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे पुर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना पक्के व मजबुत रस्ते मिळणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार यांचेही  समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार आर आर टी देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास पदाधिकारी अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS