बीड – पंकजा मुंडेंकडून परळीकरांना संक्रांतीची अनोखी भेट !

बीड – पंकजा मुंडेंकडून परळीकरांना संक्रांतीची अनोखी भेट !

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीच्या नागरिकांना संक्रांतीची भेट देत विकासाचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला आज नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून तसा आदेशही आज निर्गमित केला आहे.

ग्रामीण भागाबरोबरच परळी शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाकडे सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या २० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा आराखडा मान्यही करण्यात आला होता.

या आराखड्यातंर्गत वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच मेरू पर्वताचे सुशोभिकरण, पाणी पुरवठा, स्वच्छता, भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत. हा विकास आराखडा १३३ कोटी ५८ लाख रूपयांचा असून आज त्याला नगरविकास विभागाचे आदेश शासन निर्णय क्र. एमयुएम २०१८/प्र.क्र.३४३/नवि १७/दि.१५.०१.२०१९ अन्वये मंजूरी देण्यात आली. या विकास आराखड्यातंर्गत २० कोटी रुपयांचा निधी देखील यापूर्वीच अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंची शब्दपूर्ती

———————————–

पंकजा मुंडे यांनी शहरात नुकत्याच झालेल्या पांच कोटी रूपयांच्या अंतर्गत रस्ता कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात परळीच्या विकासाचे दायित्व घेतल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार  आठच दिवसांनी त्यांनी १३३ कोटी ५८ लाख रुपयांचा तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा मंजूर करून घेत दिलेला शब्द पाळला. अंतर्गत रस्त्यासाठी आणखी २५ कोटी रुपयांचा निधी देखील त्यांनी नगरविकास विभागाकडून मंजूर करून घेतला असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. एकंदरीत ग्रामीण भागाबरोबरच शहरासाठीही निधी मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS