परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज परळी – बीड – नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या कामाची आज पाहणी केली. पाहणीनंतर रेल्वे आणि महसूल अधिका-यांच्या बैठकीत या संपूर्ण कामाचा आढावा घेवून सदर काम जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. २६१ किमी. लांबीच्या या मार्गावर केंद्र व राज्य सरकारचे मिळून २८५६ कोटी रूपये खर्च होणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे हया सध्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न करत असून २०१९ अखेरपर्यंत बीड पर्यंत रेल्वे धावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे.
परळीत केली कामाची पाहणी
नगर-बीड प्रमाणेच रेल्वेमार्गाचे काम परळी पासूनही सुरू करावे अशी सूचना ना. पंकजाताई मुंडे यांनी केली होती, त्यानुसार कांही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परळीत या कामाला सुरूवात झाली होती. आज ना. पंकजाताई मुंडे यांनी एन.एच.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठिमागील बाजूस सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
त्यानंतर त्यांनी चेमरी विश्रामगृहात रेल्वे व महसूल विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. परळी ते बीड या ९० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून माती भराव, सपाटीकरण, लहान मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
हा मार्ग पुढील वर्षाखेरीस पुर्ण करण्याचे उद्दिष्ट असून काम वेळेत व जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या.
या बैठकीस उप जिल्हाधिकारी गणेश महाडिक परळी, गणेश नि-हाळी पाटोदा, प्रियंका पवार माजलगांव, जिल्हा कृषी अधीक्षक चपळे, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी अभियंता योगेश गरड, वरिष्ठ अभियंता सत्येंद्र कुंवर, तहसीलदार शरद झाडके आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS