परळी – परळी मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला पण मी आणलेल्या कामांचे घाईघाईने उद्घाटनं करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे, विकास कामांचे नारळ फोडण्याची एवढीच हौस होती तर मागच्या वेळ सत्ता असतांना का तुम्हाला निधी आणता आला नाही असा खडा सवाल करून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
मांडवा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ९६ लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांसह रस्ते, तीर्थक्षेत्र विकास व अन्य ७ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या भागाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. खूप संघर्षातून ते सत्तेत आले पण नियतीला ते मान्य नव्हते, त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. मांडव्याची पाणीपुरवठा योजना करूनच गावांत येईल असा शब्द मी दिला होता तो मी पुर्ण केला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा खोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह सर्व कांही दिले. जनतेच्या पायावर विकासाचा अभिषेक मला करायचा आहे त्यासाठी तुमचे आशीर्वाद सदैव मला पाहिजेत असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
जिल्हयाचा विकास साधला
केवळ मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्हयाचा विकास साधण्याचे काम केले असे सांगून ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, जिल्हयाला प्रगतीपथावर न्यायचे आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचे काम सर्वत्र दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आणल्या. दुष्काळग्रस्त शेतक-यांना आधार देण्यासाठी ६१६ कोटी रूपये मंजूर करून घेतले त्यापैकी १२६ कोटी रूपये जमा देखील झाले आहेत. कामात चालणारी बोगसगिरी बंद केली त्यामुळे आज चित्र बदलले आहे.
राष्ट्रवादीवर हल्लाबोल
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाटकीपणाचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत कोणाला उभा करायचे याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजूनही पेचात आहेत. भाषणात गप्पा ठोकणा-यांचेही उभा राहण्याचे धाडस होत नाही. उमेदवारीबद्दल विचारले की सांगतात शरद पवारांनी आदेश दिला तर उभा राहू, अशा वेळी पवारांची आठवण येते मग तोडपाणीचे राजकारण करतांना कशी त्यांची आठवण येत नाही असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीचा उमेदवार कुणीही असो इथली जनता मुंडे साहेबांचा स्वाभिमान कमी होवू देणार नाही असा ठाम विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच पार्वतीबाई मुंडे व सुंदर मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. पेयजल योजना, काळभैरव मंदिर तीर्थक्षेत्र, खासदार निधीतून सभागृह, २५१५ तून सभामंडप, अंतर्गत रस्ते, मांडवा-मलकापूर रस्ता, पुलाचे बांधकाम आदी विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमास सर्वश्री नामदेवराव आघाव, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, डाॅ. शालिनी कराड, रमेश कराड, भीमराव मुंडे, राजेश गिते, बिभीषण फड, राजाभाऊ फड, रविंद्र कांदे, सुरेश माने, सुधाकर पौळ, नेताजी देशमुख आदींसह असंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
COMMENTS