पंकजा मुंडेंकडून परळीकरांना  नव वर्षाची अनोखी भेट!

पंकजा मुंडेंकडून परळीकरांना नव वर्षाची अनोखी भेट!

परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी नगर विकास विभागाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष रस्ता अनुदानाच्या रूपाने नागरिकांना त्यांनी नव वर्षाची भेटच दिली असून लवकरच या कामांचा शुभारंभ होणार आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित आणि ढिसाळ कारभारामुळे शहरातील अंतर्गत रस्ते व नाल्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नगरपरिषदेत भाजपची सत्ता नसली तरी शहरातील जनता माझी आहे हे ओळखून विकासाचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शासनाच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

पुर्वीचे ५ आणि आता २० कोटी

पंकजा मुंडे यांनी यापूर्वी अंतर्गत रस्ते कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला मंजूर करून घेतला होता, या कामाची सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून येत्या कांही दिवसात पंकजा मुंडे यांच्या हस्ते कामाला सुरवात होणार आहे. शहरातील विविध प्रभागात रस्त्याची २६ कामे यातून होणार आहेत. रस्ता कामाची वाढती गरज लक्षात घेऊन आता आज पुन्हा एकदा त्यांनी २० कोटी रुपयांचा निधी विशेष रस्ता अनुदानातून मंजूर करून घेतला आहे. या कामाच्या मंजूरीचा आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिवाच्या स्वाक्षरीने आज निर्गमित झाला आहे. या निधीतून शहराच्या विविध भागातील रस्ते व नाली बांधकामाची १४१ कामे होणार आहेत. याशिवाय आणखी १० कोटी रूपये याच अनुदानापोटी परळीला मिळणार आहेत.

नागरिकांना नव वर्षाची भेट

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सत्तेचा पुरेपूर उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी केला आहे. ग्रामविकास विभागाच्या तसेच विविध योजनांच्या माध्यमातून एकीकडे ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असतांनाच दुसरीकडे शहराकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले आहे, रस्ता अनुदानाची मोठी रक्कम मंजूर करून त्यांनी शहर वासियांना नवीन वर्षाची भेट दिल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

COMMENTS