बचतगटांमुळे महिला बनल्या कुटूंबाचा आर्थिक कणा – पंकजा मुंडे

बचतगटांमुळे महिला बनल्या कुटूंबाचा आर्थिक कणा – पंकजा मुंडे

परळी – महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, समाजात त्यांना सन्मान व प्रतिष्ठा मिळावी हा दृष्टिकोन समोर ठेवून सरकारने बचतगटांची चळवळ प्रभावीपणे राबविल्यामुळे आज महिला कुटूंबाचा आर्थिक कणा बनल्या आहेत, महिलांची ही ताकद आणखी वाढविण्यासाठी मी कटीबध्द आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामविकास विभाग व जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून अमर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महिला स्वयं सहायता बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ. शालिनी कराड, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण बचतगटांच्या महिलांना संबोधित करताना पंकजा मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या, माझ्या सत्तेच्या कारकिर्दीत आपल्या जिल्ह्यात बचतगटाची चळवळ अधिक गतीमान झाली. महिला व बालविकास विभागाची मंत्री या नात्याने आज बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात महिला बचत गटांची स्थापना झाली असून ही प्रक्रिया आणखी वाढीस लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आज आमच्या माता भगिनींच्या हातात पैसा येतो आहे, ऊसतोड मजूर म्हणून काम करणा-या महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत, महिलांना समाजात सन्मान देणा-या योजना आम्ही राबविल्या, त्यामुळे बचतगटांच्या चळवळीचे यश आज दिसत  आहे. परळी तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी बाहेर जाऊन आपला व्यवसाय वाढवावा व स्वावलंबी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘भारत के वीर’ उपक्रमाला हातभार

पुलवामा हल्ल्यातील भारतमातेच्या वीर शहीद सुपुत्रांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी ‘भारत के वीर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील विविध भागांतील लोकांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून विविध प्रशासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यां सोबत ग्रामीण भागातील महिला देखील यात सहभाग नोंदवत मोठा आर्थिक निधी देत आहेत. आजच्या कार्यक्रमात तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील प्रभात ग्रामसंघाच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश पंकजा मुंडे यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे ३० स्टाॅल्स उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. ग्रामीण बचतगटांच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS