मुंबई – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. परंतु अशातच पंकडा मुंडे यांनी पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पक्ष बदलाच्या केवळ अफवा असून बंडखोरी माझ्या रक्तात नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली.याबाबत भाजपचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राम शिंदे यांनी पंकजा मुंडेंच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. गोपीनाथगडावर सालाबादप्रमाणे दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो. त्या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर घोषणा केली.
त्या दरवर्षीच अशी घोषणा करतात. या दिवशी त्या वर्षभरासाठी एक वेगळी दिशा देत असतात. तशीच ही घोषणा होती. मात्र, माध्यमांनी त्यांच्या या घोषणेचा विपर्यास केला असल्यामुळे त्या व्यथित झाल्या असल्याचं राम शिंदे म्हणाले आहेत.
COMMENTS