परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कंत्राटदाराला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. परळी – पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरु असल्याची गंभीर दखल त्यांनी घेतली आहे,संबंधित कंत्राटदाराने दोन दिवसांत कामाचा वेग न वाढविल्यास काम काढून घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
परळी ते पिंपळा धायगुडा या १८.४४ किमी. लांबीच्या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी मध्ये रूपांतर झालेले असून हा रस्ता आता तीन पदरी होणार आहे. १३४ कोटी रूपये खर्च करून तयार होणा-या या रस्त्याचे काम सुनील हायटेक या कंपनीला मिळालेले असुन त्यांनी ते काम आयडी इन्फ्रा कंपनीकडे सोपवले आहे. गेल्या वर्षी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने याचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
कंत्राटदाराने काम सुरू करून एक वर्ष उलटून गेले तरी अतिशय संथ गतीने काम चालू असल्याने ते अजूनही पूर्ण होवू शकले नाही. काम सुरू करतांना एका बाजूने रस्ता खोदत दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करणे आवश्यक असतांना संपूर्ण रस्ताच कंत्राटदाराने उखडून ठेवला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दोन्ही बाजूने रस्ता उखडल्यामुळे तसेच पुरेशा प्रमाणात पाणी न टाकणे, व्यवस्थित दबाई न केल्याने वाहनधारकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कामातील दिरंगाईमुळे कंत्राटदाराविषयी नागरिक व वाहनधारकांच्या मनात मोठा रोष निर्माण झाला आहे.
अन्यथा काम काढू
नागरिक व वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेवून पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी संबंधित अधिका-यांना बोलून त्यांची चांगलीच कान उघडणी केली. रस्त्याच्या कामाचा वेग दोन दिवसांत न वाढविल्यास संबंधित कंत्राटदारांकडून काम काढून घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
COMMENTS