नागपूर – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदही माझ्यामुळेच मिळाले असल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने काही त्यांना मंत्री केले नाही. परंतु मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते बनविण्यात आलं. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही धनंजय मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले असल्याचा टोला यावेळी पंकजा मुंडे यांनी लागावला आहे.
दरम्यान भाऊ असूनही मला धनंजय मुंडे यांच्यामुळे जीवनात संघर्ष करावा लागला असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी या संघर्षातून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले. आता माझा संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.तसेच मला केवळ ओबीसी नाहीतर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडल्यापासून त्यांच्याशी कोणतेही कौटुंबिक सबंध राहिलेले नाहीत. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय मुंडेंनी माझ्या डोक्यावर हात ठेवायला हवा होता. असे झाले असते तर कदाचित आज वेगळे चित्र असते. परंतु त्यावेळी ते माझ्या विरोधात निवडणूक लढले एवढच नाही तर त्यांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करून मला त्रास दिला असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS