मुंबई – भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात घ्यावी अशी मागणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ उप समितीच्या बैठकीत केली. ही बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी केलेल्या चारा छावणीच्या अनुदानात वाढीच्या मागणीला यश मिळाले असून आता प्रति पशूधनाला शंभर व पन्नास रूपये अशी वाढ या बैठकीत मंजूर करण्यात आली.
मंत्रिमंडळ उप समितीची बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पंकजा मुंडे यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईकडे सर्वाचे लक्ष वेधले. मराठवाड्यातील सर्व धरणे तसेच नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत, जनता पाण्यासाठी त्रासली आहे, जनावरांसाठी पाणी व चा-याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घ्यावी, जेणेकरून याचा उपयोग या भागाला होईल अशी मागणी त्यांनी केली. सिंचन अनुशेष अन् पाण्याची तुट भरून काढण्यासाठी अन्य धरणांतून पाणी द्यावे अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
चारा छावणीच्या अनुदानात वाढ
दुष्काळाच्या परिस्थितीत चारा छावणीच्या अनुदानात प्रति पशूधन मोठ्या जनावरांना १२० रूपये व लहानांना ६० रुपये वाढ करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी कालच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्राद्वारे केली होती. आज यासंदर्भात बैठकीत विषय त्यांनी मांडला. या मागणीची तात्काळ दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या जनावरांना १०० रूपये व लहानांना ५० रुपये अशी वाढ करण्यास मंजूरी दिली. या वाढीमुळे आता छावणी चालकां बरोबरच पशूधन पालकांनाही दिलासा मिळणार आहे.
शेळी-मेंढींना चारा तसेच जनावरांसाठी जादा पाणी द्या
दुष्काळी परिस्थितीत शेळी व मेंढ्यांना देखील चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, तशी तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्याबरोबरच ना. पंकजाताई मुंडे यांनी नागरिक व ग्रामस्थांना सध्या जेवढ्या प्रमाणात टॅकरने पाणी पुरवठा केला जातो, त्यात आणखी वाढ करून जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीही बैठकीत केली.
COMMENTS