मतांसाठी जातीचा आधार घेणारांनी बीड जिल्ह्यात दमडीही आणली नाही – पंकजा मुंडे

मतांसाठी जातीचा आधार घेणारांनी बीड जिल्ह्यात दमडीही आणली नाही – पंकजा मुंडे

बीड – मतांसाठी जातीचा आधार घेणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता असताना बीड जिल्हयात दमडी तरी आणली का? असा खडा सवाल करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा व राडी येथे झालेल्या जंगी सभांमधून अवघा मराठा बांधव डाॅ. प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी एकवटल्याचे दिसून आले.

भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ आज पाटोदा ममदापूर आणि राडी येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, सुनील लोमटे, राजेश कराड, अच्यूत गंगणे, दिनेश परदेशी, उमेश पवार, हिंदूलाल काकडे, गोविंद जामदार, विलास जगताप, राहूल मोरे, प्रशांत आदनाक आदी यावेळी उपस्थित होते.

बीड हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे, जाती पातीच्या पलिकडे जाऊन या जिल्हयाने आतापर्यंत खासदार निवडले परंतु, या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जातीचा आधार घेऊन जनतेला भिती दाखवत आहे. जातीसाठी माती खा असे म्हणणा-यांनी जनतेला पाणी प्या असे म्हणून सिंचनाचे एक तरी काम केले का? असा सवाल ना. पंकजाताई मुंडे यांनी केला. मी मंत्री असले तरी आताचे सरकार हे तुमचे सरकार आहे, विकास कामे करून घेण्यासाठी मला कुणाच्या दारात बसावे लागत नाही, मी अशी मंत्री आहे की ज्याच्या पत्राला सरकारमध्ये वजन आहे त्यामुळेच जिल्हयात एवढा मोठा निधी आणून कामे करू शकले असे त्या म्हणाल्या.

बीड जिल्हा सात वर्षात हिरवागार होईल

आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला भकास करण्याचे काम केले, मागासलेपणाचा शिक्का मारला. परंतु, आम्ही आता ३२ हजार कोटींच्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा व गोदावरी खो-याचे पाणी बंद पाईपमधून बीडमध्ये आणणार आहोत. भविष्यात तुमच्या शेतीलाही पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.पुढील सात वर्षात जिल्हा हिरवागार होईल, पावसाची चिंता अजिबात राहणार नाही असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे, त्यामुळे बीड जिल्हादेखील आता उपेक्षित राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून येत्या १८ तारखेला कमळाचे बटन दाबून डाॅ. प्रितम मुंडे यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.

COMMENTS