बीड – परळीमध्ये मराठा मोर्चेकरांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांची आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते असं म्हटलं आहे. तसेच मी सरकारची नाही तर मराठी बांधवांची दूत बनणार असल्याचंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मी तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आणि वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे. मी तुम्हाला वाकण्यास सांगणार नाही. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलावर असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते. हवं तर जीव घ्या, पण जीव देऊ नका असं आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी या कार्यकर्त्यांना केलं. काकासाहेब शिंदे यांच्याबद्दल बोलताना आपण एक मराठा लाख मराठा म्हणतो, मग एक तरुण मेला म्हणजे लाख तरुण मेले नाहीत का ? असा सवालही यावेळी पंकजा मुंडे यांनी केला आहे.
COMMENTS