मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील पर्यायी रस्त्याच्या रुंदीकरण व नुतनीकरणासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ४८ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालखीतील भाविकांच्या वाहनांची सोय यामुळे होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य केल्याबद्दल वारकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.
पंढरपूर येथील आषाढी वारीच्या वेळी पंढरपूर ते पिराची कुरोली तालुका हद्द (जुना अकलूज रस्ता) या रस्त्यावरून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून भाविक या रस्त्याचा वापर करतात, तसेच आषाढी वारीच्या काळा व्यतिरिक्त इतरवेळीही या रस्त्याचा वापर होतो. याचे रुंदीकरण व नुतनीकरण करावे अशी भाविकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. भाविक व वारक-यांची मागणी लक्षात घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर ते पिराची कुरोली पालखी मार्ग भाग एक या २१ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ३४ कोटी ५१ लाख आणि याच रस्त्याच्या माळशिरस तालुक्यातील भाग दोन या ८.३० किमी लांबीच्या रस्त्यासाठी १४ कोटी २४ लक्ष असा ४८ कोटी ७५ लक्ष रूपयांचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून विशेष बाब म्हणून मंजूर केला आहे. हे दोन्ही पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याने भाविकांची चांगली सोय होणार आहे, याबद्दल तमाम वारक-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS