मुंबई – राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी पंकजा मुंडे मंत्री असलेल्या ग्रामविकास खात्याची 2 पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पंचायत समित्या पंकजाताई मुंडे यांच्या मतदारसंघातील असून त्यावर वर्चस्व मात्र धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे.
राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम करणा-या पंचायत समित्यांना पारितोषिक दिली जातात, सदर कार्यक्रम आज मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदीरात राज्यपाल आणि ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
औरंगाबाद महसुली विभागातून या अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल 9 लाख रुपयांचा पहिला पुरस्कार बीड जिल्हयातील अंबाजोगाई पंचायत समितीला तर 7 लाख रुपयांचा पुरस्कार दुसरा परळी पंचायत समिती मिळाला.
या दोन्ही पंचायत समित्या पंकजाताई मुंडे यांच्या मतदार संघातील असून त्यावर सत्ता मात्र धनंजय मुंडे यांची आहे. आपल्या विरोधकांच्या ताब्यातील पंचायत समित्यांचे चांगले कार्य मान्य करीत पंकजाताई यांनाच हे पुरस्कार द्यावे लागले.
पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर दोन्ही पंचायत समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, त्यांनी पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले. खात्याच्या मंत्री यांच्याकडून निधी देण्यात पक्षपात केला जात असला तरी पदाधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम करून आम्हीच सर्वोत्कृष्ट आहोत हे दाखवून दिले असल्याचे मुंडे म्हणाले.
यावेळी परळी पंचायत समितीच्या सभापती सौ. कल्पना मोहन सोळंके, उपसभापती बालाजी मुंडे, अंबाजोगाई चे सभापती सभापती मिनाताई शिवहार भताने ,उपसभापती तानाजी देशमुख, बीडीओ नागरगोजे,विस्तार अधिकारी सावद,निळकंठ दराडे,शेख सर, लोखंडे व इतर उपस्थित होते.
COMMENTS