पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रास मिळणार ३५ कोटींचा निधी !

पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रास मिळणार ३५ कोटींचा निधी !

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रास ३५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सदर निधी पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध करून देणार असल्याचे  अर्थमंत्र्यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत सांगितले.

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेवून आढावा घेतला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला आहे. या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध करून देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. या निधीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम पंकजा मुंडे यांच्याकडून निश्चित करून घ्यावा असेही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेस हरीहर तीर्थाजवळ दर्शनी मंडप,  प्रतिक्षागृह, धर्मशाळा, यात्री निवास, स्वच्छतालयाचे बांधकाम, मेरू पर्वताजवळ कॉटेजचे बांधकाम, मेरु पर्वतावर उद्यान विकसित करणे, मंदिराकडे जाणारे रस्ते विकसीत करणे, हरीहर तीर्थाजवळील उद्यान विकसीत करणे,  मंदिर व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे,  हेलिपॅड, प्रदक्षिणा मार्ग विकसीत करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, डोंगरतुकाई देवी पोच रस्त्याची कामे,  या ठिकाणी उद्यान विकसीत करणे, काळ्या दगडाच्या दीपमाळ बांधणे अशी अनेक कामे आराखड्यातून करण्यात येत आहेत. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असुन प्रतिवर्षी 30 लाखांहून अधिक भाविक या मंदिराला भेट देतात. भाविकांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्रिशुळ, डमरू, नंदी यांच्या प्रतिकृती, दर्शन रांगेत ओम नम् शिवायः चा जप, बेलाच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्या सर्वांची रोपे इथे लावुन बेलवन, महादेव वन तयार करण्यात येणार आहे.  आराखड्यातील जी कामे श्रावण महिन्यापुर्वी करता येतील ती प्राधान्याने हाती घ्यावीत असे सांगून मंदिराला पुर्व रुपात आणण्यासाठी एक कोटी रुपयाचा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

COMMENTS