खडसेनंतर टार्गेट पंकजा मुंडे, खांदा सुरेश धस यांचा मात्र बंदूक कोणाची ?

खडसेनंतर टार्गेट पंकजा मुंडे, खांदा सुरेश धस यांचा मात्र बंदूक कोणाची ?

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी गेली पाच वर्ष खडसे आणि भाजप असा संघर्ष सुरू होता. 2014 मध्ये राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर ज्येष्ठ असलेल्या खडसेंना बाजून ठेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यावेळेपासून खडसे आणि फडणवीस यांच्यात धुसफूस सुरू झाली होती. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन खडसेंना फडणवीस सरकारमधून राजीनामा द्यावा लागला. त्यातून खडसे आणि फडणवीस यांच्यातला वाद विकोपाला गेला. राजीनाम्यानंतर खडसे हे फडणवीस यांच्यावर सातत्याने टिका करत राहिले. फडणवीसांनी त्यांना उत्रर दिलं नाही मात्र सातत्याने खडसेंना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला. खडसेंनी याची तक्रार भाजपच्या हायकमांडकडेही केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपचे हायकमांडही आपली दखल घेत नाहीत हे लक्षात आल्यानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खडसे आणि फडणवीस वादावर एवढं सांगण्याचं कारण म्हणज्ये खडसेनंतर आता पंकजा मुंडेंचा खडसे होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचं चित्र आहे. 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर पंकजा मुंडे याही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र भाजप हायकमांडने फडणवीसांना संधी दिली. तेंव्हापासून पंकजा आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची कजबूज राजकीय वर्तुळात आहे.

खडसे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनीही पक्षाच्या हायकमांडवर अप्रत्यक्षपणे का होईना हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. मंगळवारी पुण्यात ऊसतोड मजुरांच्या वेतनवाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्यातील संबधित खात्याचे मंत्री आणि उसतोडणी मजुरांचे प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे आणि सुरेश धस हेही उपस्थित होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. बैठकीमध्ये उसतोड मजुरांच्या वेतनात 14 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुकादमांच्या कमिशनमध्ये अर्धा टक्के वाढ करण्यात आली. आणि या वाढीवरुनच पंकडा मुडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात जुंपली आहे. पंकजा मुंडे यांनी या वेतनवाढीवर समाधान व्यक्त केलं आहे. तर सुरेश धस यांनी या वेतनवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश धस यांनी 85 टक्के वेतनवाढ करावी अशी मागणी केली होती. अर्थातच ती मान्य झाली नाही.

आम्हाला ही वेतनवाढ अजिबात मान्य नाही असं वक्तव्य धस यांनी केलं. आमच्या नेत्यांचं या वेतनावधीवर कसं काय समाधान झालं असा टोलाही धस यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनीही धस यांना प्रत्युत्र दिलं आहे. मी वेतनवाढीचा कोणताही आकडा मनात घेऊन आले नव्हते. पण जे व्यवहार्य आहे तेच बोलते. उगीच काहीतरी सांगायचं मग बिचारे उसतोडणी कामगारांना आशा लागून राहते आणि निर्णय झाल्यावर ते नाराज होतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शक्य आहे. ते केले. काही अतिशोक्ती केली नाही असं म्हणत धस यांना टोला लगावला.

 

सुरेश धस यांच्यावर टीका करताना पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजप नेतृत्वावरही टीका केली. मी परदेशात असताना भाजप नेतृत्वाने सुरेश धस यांना या प्रश्नावर राज्यात फिरण्यासाठी पत्र दिलं होतं. या प्रकारामुळे या प्रश्नाला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्याचा हल्लाबोल पंकजा यांनी भाजप नेतृत्वावर केला आहे. असं पत्र देण्यामागे भाजप नेतृत्वाचा काही वाईट हेतू नसेल असा चिमटाही त्यांनी काढला.

एकंदरीतच उसतोडणी कामगारांच्या प्रश्नावरुन पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा सामना रंगला आहे. मात्र खांदा सुरेश धस यांचा असला तरी बंदूक कोणाची आहे आणि पुढे हा वाद कसं स्वरुप धारण करतो आणि खडसेंच्या वाटेवर पंकजा जातात का ? ते काही दिवसातच स्पष्ट होईल.

COMMENTS