धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच होतं –पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच होतं –पंकजा मुंडे

बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. उसाच्या रसाची टाकी फुटूल्यानं ही दुर्घटना घडली होती. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते. मात्र आपल्याला अडवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर पंकजा मुंडेंनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे.धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच होतं असं त्या म्हणाल्य आहेत.

वैद्यनाथ साखर कारखान्यात जी घटना घडली, त्या घटनास्थळी जाण्याची कुणालाही परवानगी नाही. कारखान्याची घटना ही अपघात आहे की आणखी काही याचा तपास सुरु आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे त्याठिकाणी जाण्यास धनंजय मुंडेंनाही अडवलं होतं यात काही गैर नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

दुर्घटनेनंतर आमचे संचालक मंडळ आणि कार्यकर्ते जखमींच्या उपचारामध्ये व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढत असल्याचं आढळलं.तपासणीला यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने घटनास्थळावर तपासणी अधिकारी आणि संबंधित वगळता कोणीही जाऊ नये, हा योग्य निर्णय घेऊन आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होतं, त्यावर पोलिसांनी कारवाई करणं योग्यच होतं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS