मंत्रिमंडळ खातेवाटपावर मी समाधानी नव्हते, पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट !

मंत्रिमंडळ खातेवाटपावर मी समाधानी नव्हते, पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट !

बीड – जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं वक्तव्य करुन काही दिवसांपूर्वी श्रेष्ठींची आणि मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा तसंच वक्तव्य केलं आहे. महिला बालकल्याण आणि ग्रामविकास खात्यावर मी खूश नव्हते असं वक्तव्य त्यांनी केलंय. काल बीडमध्ये एका कार्यक्रमात शिक्षकांसमोर त्या बोलत होत्या. मात्र मनासारखं खातं मिळाल नसतानाही मी त्यामध्ये मनापासून काम केलं आणि ते खातं नावारुपाला आणलं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पंकजा मुंडे बोलत होत्या. सगळ्यांनाच न्याय देण्याचा प्रय़त्न केला आहे. सर्व बदल्या पारदर्शकपणे केल्या आहेत. पण तरीही 100 टक्के समाधानी करणे शक्य नाही. तरीही तुम्ही मनापासून काम करा असा सल्ला पंकजा मुंडे यांनी शिक्षकांना दिला. प्रत्येकवेळी मनासारखे घडत नाही, मात्र जे मिळेल ते मनापासून केले तर त्याचे समाधान मिळते असंही त्या म्हणाल्या. मलाही खातेवाटपाच्यावेळी ग्रामविकास आणि महिला बालकल्याण ही खाती मिळाली तेंव्ही मी खूश नव्हते. तरीही मी त्या खात्यांमध्ये मनापासून काम केले. आणि ती खाती नावारुपाला आणली असा दावाही त्यांनी केला.

COMMENTS