बीड, परळी – राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शहरातील बस स्थानकासमोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने चौक आहे. या ठिकाणी साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मातंग समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. मानवी हक्क अभियानचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम मिसाळ व तालुकाध्यक्ष बबन कसबे यांनी या संदर्भात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची कांही दिवसांपुर्वी भेट घेवून पुतळा बसविण्याची मागणी केली होती. पंकजा मुंडे यांनी तातडीने त्यांची ही मागणी मान्य करून पुतळा बसविण्याचा शब्द दिला होता. आता या शब्दाची पुर्ती होत असुन पुढील महिन्यात येणार्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा पुतळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने बसविण्यात येणार आहे. पुतळ्याचे अनावरण व मातंग समाजाचा मेळावा हे दोन्ही कार्यक्रम पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साठे चौकात उभारणार येणार असल्यामुळे तालुक्यातील मातंग समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेवून पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS