बीड – जिल्ह्यातील सर्वात हॉट मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या वतीने धनंजय मुंडे यांची उमेदवारी अंतिम झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे उमेदवार कामाला लागले आहेत. परंतु या सर्वांमध्ये वेगळे नाव आणि साधारणतः 30 वर्षानंतर विधानसभेच्या फडामध्ये संजय दौंड यांच्या माध्यमातून नवीकोरी पाटी म्हणून आणि दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आघाडीकडून संजय पंडितराव दौंड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दौंड यांनी देखील मतदारसंघामध्ये गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील लढत ही रंजक होणार आहे. दौंड यांच्यासोबतच या मतदारसंघातून प्रा. टी. पी. मुंडे, फुलचंदराव कराड, यांचीही उमेदवारी असू शकते. त्यासोबतच वेगवेगळ्या जाती धर्मातील उमेदवार देखील आपला नशिबाचा कौल आजमावू शकतात.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्यापासून रंगतदार होत असते. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. मुंडेंच्या राजकीय उत्कर्षामध्ये या मतदारसंघाचे योगदान खूप मोठे राहिलेले आहे. या मतदारसंघाने आजवर म्हणजे साधारणतः गेल्या 30 वर्षात मुंडेशिवाय इतरांना संधी दिलेली नाही. त्यापूर्वी 1985 साली माजी राज्यमंत्री ऍड. पंडितराव दौंड यांना संधी मिळाली होती. 1990 नंतर मात्र, लोकनेत्यांनी कोणाचे चालू दिले नाही. 30 वर्षानंतरही या मतदारसंघावर मुंडेंची पकड असल्याचे दिसते आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व पंकजा मुंडे या करीत आहेत. त्यांची दुसरी टर्म सुरू असून 2009 सालापासून म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून त्या या भागाच्या आमदार आहेत. गेल्या पाच वर्षापासून मंत्रिपदावर आरूढ आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले परंतु पंकजाताईंनी त्यांना चीत केले. यावेळची निवडणूक ही निश्चितच आगळीवेगळी असणार हे स्पष्ट दिसून येत आहे. गेली 30 वर्षे पंडितराव दौंड किंवा त्यांचे कुटुंबिय हे विधानसभेच्या आखाडयात उतरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संजय दौंड व सौ. आशाताई संजय दौंड यांची वाटचाल राहिली. मधल्या काळात सौ. आशाताई दौंड या बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून देखील राहिल्या. या दोन्ही प्रस्थापितांना आव्हान देण्याची भूमिका विद्यमान कॉंग्रेस नेते संजय दौंड यांनी घेतली असल्याचे दिसत आहे. कारण या भागातील जे मतदार आहेत. त्यांनीच दौंड यांना लढण्याची विनंती केली आहे. कारण प्रस्थापित दोन्ही नेतृत्वांना सामान्य मतदार कदरला आहे. त्यांना पर्याय आवश्यक वाटत होता. परंतु त्या ठिकाणी कुणीही पर्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मुंडे कुटुंबियांची सद्दी या ठिकाणी राहिली. आता या धनदांडग्यांच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटण्याची भूमिका दौंड यांनी घेतली आहे. संजय दौंड हे गेल्या 30 वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. या भागातील ग्रामीण माणसाचा देवदूत म्हणून त्यांची ओळख आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून आलेल्या प्रत्येक रुग्णांची ते आस्थेवाईकपणे चौकशी करून मदत व सहकार्य करीत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत ते सदैव जनमतांच्या सहकार्याने जिंकलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी, पट्टीवडगाव, घाटनांदूर, बर्दापूर या चार जिल्हा परिषद सर्कलवर प्रभाव आहे. साधारणतः हे चारही सर्कल दौंड यांच्या बाजूने राहिले तर त्यांचा विजय निश्चित आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि दौंड यांचा जनसंपर्क यामुळे दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना धक्का बसू शकतो. त्या अनुषंगाने दौंड यांनी परळी विधानसभा मतदार संघातून जनमतांचा कौल घेणे सुरू केले आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. माजी राज्यमंत्री ऍड. पंडितराव दौंड यांचे चिरंजीव असलेल्या संजय दौंड यांना भाऊ या नावाने ओळखले जाते. शिवाय ऍड. पंडितराव दौंड हे ग्रामविकास राज्यमंत्री असतांना त्यांनी केलेले काम हे लक्षणीय राहिलेले आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे पाझर तलाव, साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे व महत्त्वाचे तलाव उभारले आहेत. त्यामध्ये दौंड यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आजही या मतदारसंघात त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मानणारा वर्ग असल्याने ते निश्चितच धक्का देऊ शकतात असा विश्वास सामान्य मतदारांना आहे. दौंड यांनी जनता दरबारात जाऊन कौल घेतलेला आहे. त्यामुळे आगामी काळात दौंड हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील असा सूर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय घडामोडी होतील याकडे परळी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
COMMENTS