परळी – पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान व मुंबई येथील वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या ८ दिवसात परळी येथे घरोघरी नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग करण्यात आले असून या माध्यमातून एकूण १ लाख १४ हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या पूर्ण तपासणी साठी वन रुपी क्लिनिकच्या दहा डॉक्टर्सची टीम गेल्या आठ दिवसांपासून परळीत स्थित होती. या टेस्ट दरम्यान शहरात तापाचे ८५, सर्दी – खोकल्याचे ३४ तर अन्य किरकोळ आजाराचे २३ रुग्ण आढळून आले असून त्यांची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयांस कळविण्यात आली आहे, तसेच आवश्यकतेनुसार स्वॅब टेस्ट व अन्य वैद्यकीय उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे.
वन रुपी क्लिनिकने या कठीण काळात सामाजिक भान ठेवून या संपूर्ण टेस्टिंगसाठी केवळ ‘एक रुपया’ फीस घेतली असून, धनंजय मुंडे यांनी वन रुपी चे संचालक डॉ. राहुल घुले यांना एक रुपया देऊन, समस्त परळीकरांच्या वतीने त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या परळीतील नागरिकांप्रति असलेल्या तळमळीने आम्ही भारावून गेलो, वन रुपी क्लिनिकने आज १ लाख १४ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण केली असून भविष्यात कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास आमची सर्व टीम कधीही सेवेसाठी तयार अस्वल तसेच सध्या कोरोनाचे संकट पूर्णपणे टळेपर्यंत आमचे दोन डॉक्टर्स परळीतच राहणार असल्याचे वन रुपी चे संचालक डॉ. राहुल घुले म्हणाले.
या टेस्टिंगला यशस्वी करण्यासाठी डॉ. घुले यांच्यासह वन रुपीच्या डॉ. दीपक राठोड, डॉ. संजय गवळी, डॉ. नितीन रोडे, डॉ. अनंत दराडे, डॉ. गजानन कोटलवार, डॉ. अविनाश दाभाडे आदी सर्व टीमने अविरत परिश्रम घेतले.
परळी मतदारसंघात वन रुपी क्लिनिकच्या धर्तीवर दोन मोबाईल हॉस्पिटल सुरू करणार मुंडे
परळीत येऊन गेल्या ८ दिवसात १ लाख १४ हजार नागरिकांचे मोफत टेस्टिंग करणाऱ्या वन रुपीच्या संपूर्ण टीमचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले, यावेळी त्यांनी परळी मतदारसंघात लवकरच शहरात एक व ग्रामीण भागात एक असे दोन मोबाईल हॉस्पिटल वन रुपी च्या धर्तीवर सुरू करणार असल्याचे सांगितले.
तसेच परळीत वन रुपी क्लिनिकची कायमची शाखा सुरू करण्याचा मानसही यावेळी ना. मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी वन रुपीच्या टीमसह रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जि. प. गटनेते अजय मुंडे, माजी शहराध्यक्ष चंदूलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, , डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अजय मुंडे, अनंत इंगळे, अनिल अष्टेकर, रमेश चौंडे, राहुल ताटे यांसह आदी उपस्थित होते.
COMMENTS