परळी – बीड जिल्ह्यात दि. १३ मे पासून विषम दिनांकास ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यास आता परवानगी देण्यात आली आहे याबद्दल परळी येथील विविध व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तथा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मुंडेंनी जिल्ह्यात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहांना परवानगी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, त्यानुसार आता जिल्ह्यात वधू-वरांव्यतिरिक्त दहा लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स व अन्य नियमांचे पालन करून विवाह करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे या महिन्यात असलेल्या विवाह तिथींचे नियोजन व अनेक जणांचे रखडलेले विवाह आता संपन्न होणार आहेत.
बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांसह जिल्हा प्रशासनाच्या चोख व काटेकोर नियोजनाने आतापर्यंत कोरोना विषाणू पासून जिल्हा अबाधित राखण्यात यश आले आहे. एक दिवसाआड विषम दिनांकास सकाळी ७ ते ९.३० एवढीच वेळ आतापर्यंत किरकोळ विक्रीसाठी दुकानांना देण्यात आली होती. परंतु ही वेळ अपुरी असून व्यापारी वर्गास मोठी अडचण होत असल्याबाबत विविध व्यापारी महासंघसह अनेक व्यापाऱ्यांनी पालकमंत्री मुंडेंकडे वेळ वाढवून देण्यासाठी विनंती केली होती.
त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने व्यापारासाठीची वेळ वाढवुन दिली असून, नागरिक व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्स सह अन्य नियमांचे पालन करावे असे आवाहनही केले आहे. आता एक दिवसआड व्यापाऱ्यांना आपली दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळात सुरू ठेवता येणार आहेत. याचा लाभ नागरिकांसह सर्व व्यापारी वर्गास होणार असून, व्यापारी संघटनांनी याबद्दल धनंजय मुंडे व जिल्हा प्रशासनाने आभार मानले आहेत.
COMMENTS