संजय दौंड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडेंनी शब्द पाळला, वाचा मुंडे – दौंड यांच्यातील राजकीय शत्रुत्व ते मैत्री !

संजय दौंड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडेंनी शब्द पाळला, वाचा मुंडे – दौंड यांच्यातील राजकीय शत्रुत्व ते मैत्री !

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार संजय दौंड यांना दिली असून दौंड
यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला आहे.

माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात यानिमित्ताने तब्बल ३० वर्षांनी आमदारकी मिळणार आहे.
संजय दौंड हे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. दोघा पिता पुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्याचवेळी ना. मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला शब्द दिला होता, असे बोलले जाते व यानिमित्ताने तो दिलेला शब्द पवारांनी पाळला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरम्यान आज (दि. १४) विधानभवनात महाआघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील यांसह आदि उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या गटाकडे असलेल्या या जागेसाठी परळी विधानसभा निवडणुकीत दौंड कुटुंबाने केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याच्या हेतूने ना. मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आग्रह करून ही जागा संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता धनंजय मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघातूनच आणखी एक सहकारी विधिमंडळात मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

मुंडे – दौंड राजकीय शत्रुत्व ते मैत्री

परळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. आज ज्या संजय दौंड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे त्या संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांनी 1985 मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. ते काही दिवस राज्यमंत्रीही होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. 90, 99 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा 2 वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून विजय मिळवला तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला

आज त्याच संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले तर धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी दौंड पिता पुत्रानी मेहनत घेतली. आज या निमित्ताने शत्रुत्व ते मैत्री असे सर्कल पूर्ण झाले आहे.

COMMENTS