परभणी – जूनपासून पगार न झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडेल्या एका अंगणवाडी सेविकेने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतुर तालुक्यातील सुमित्रा राखुंडे असं आत्महत्या केलेल्या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
सरकार वेळेत पगार देत नाही. जुन पासूनचा पगार झाला नाहीये. ऐन दिवाळीत ही मानधन मिळालं नाही. शेतात रोज मजुरी करून मी माझा प्रपंच केला. महिन्यातून चार मीटिंग असतात, त्यासाठी 500 रुपये, अहवाल, झेरॉक्स, फोटोसाठी एकूण लागणारे 80 रुपये कुठून आणायचे, अंगणवाडिला ये-जा करायला लागणारे दररोज 20 रुपये कुठून आणायचे असा सवाल ही सुमित्रा राखुंडे यांनी लिहलेल्या चिठ्ठीत सरकारला केला आहे.
पंचायत राज समिती 8 तारखेला (बुधवारी) आजच परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहे. त्यांना गेल्या 10 वर्षातील रजिस्टर दाखवायचे आहे. ते उपलब्ध करुन द्या अशा दट्ट्या वरीष्ठांनी सुमित्रा राखुंडे यांच्याकडे लावला होता. मात्र त्यांच्याकडे फक्त 5 वर्षांचे रजिस्टर होते. त्यापूर्वी अंगणवाडीला इमारत नसल्यामुळे 5 वर्षांपूर्वीचे रजिस्टर त्यांच्याकडे नव्हते. याबाबत वरिष्ठांना सर्व माहिती सांगूनही त्यांनी ऐकले नाही. पगार नाही आणि वरिष्ठांचा जाच यामुळे सुमित्रा राखुंडे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
सुमित्रा राखुंडे या जिंतुर तालुक्यातील बोर्डी गावच्या रहिवाशी आहेत. नागनगाव या गावातील अंगणवाडीत त्या नोकरी करत होत्या. अंगणवाडी शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून 1992 पासून त्या कार्यरत होत्या. परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. ही घटना दुर्दैवी असून कर्मचार्यांनी अश्या दबावात येऊन जीवनयात्रा संपवू नये असं आवाहन करीत सुमित्रा राखुंडे यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
COMMENTS