मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं मुंबई येथील लीलावती रुग्णसल्यात दुःखद निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर आज 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं शिक्षण एम. ए. एल. एल. बी. पी एच डी इतकं झालं आहे. त्यांनी शिक्षण मंत्री, उद्योग मंत्री, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री, महसूलमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री, वनमंत्री ही पद भूषवली तसेच एकवेळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष होते. पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.त्यांचा मुलगा विश्वजीत कदम हे युवक काँग्रेसचा प्रदेशचे अध्यक्ष आहेत. तर पतंगराव कदम यांचे मोठे बंधू मोहनराव कदम हे विधानपरिषद सदस्य आहेत.
सविस्तर माहिती
राज्याचे माजी वनमंत्री डॉ पतंगराव कदम हे पलूस – कडेगावचे आमदार होते. डॉ पतंगराव कदम यांनी या आधी शिक्षण, सहकार, उद्योग, मदत पुनर्वसन महसूल या सारख्या विविध खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. काँग्रेसचे जेष्ठ आणि ताकतवान नेते म्हणून त्यांची ओळख होती. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविध्यापिठाचे संस्थापक आहेत. प्रशासनावर पकड, आणि तातडीने निर्णय घेणारे नेते अशी त्यांची ओळख होती. प्रेमळ मनाचा आणि दिलदार स्वभावाचा नेता अशी त्यांची ओळख. मंत्री पदावर असताना, कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करणे, भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांना मदत करणे, तातडीने निर्णय घेणे अशी त्यांची कामाची पद्धत. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे कदम हे निकटवर्तीय होते.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सोनसळ येथील गरीब, शेतकरी कुटुंबात पतंगराव कदम यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी कदम हे दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले त्याच्या गावातून ते प्रथम व्यक्ती होते. डॉ कदम यांनी पुण्यात माध्यमिक शाळा अर्धवेळ शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर राज्य एस टी महामंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. सांगलीसाठी स्वतंत्र विभाग त्यांनी सुरू केला.
डॉ. कदम कायदा आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी बॅचलर पदवी प्राप्त केली. त्या नंतर त्यांनी पी.एच.डी. पूर्ण केली. पतंगराव कदम यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठ स्थापन केले. देश विदेशात भारती विद्यापीठाचे शाळा आणि कॉलेज आहेत. ग्रामीण मुलं, आदिवासी, महिला आणि यासारख्या वंचित वर्गांना परवडणारे किंमतीत शिक्षण सुविधा उपलब्ध करणे. भारती विद्यापीठने शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या यशामुळे उत्तम कामगिरी नोंदवली आहे.मंत्री म्हणून शिक्षण, उद्योग, महसूल आणि वन या सारख्या खात्यात त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांच्या धाडसी निर्णया मुळे या क्षेत्रात विकासाला नवी गती मिळाली.
वनमंत्री पतंगराव कदम हे पलूस – कडेगाव या मतदारसंघातून सहा वेळा विजयी तर तीन वेळा पराभूत झाले आहेत. मागील एकोणीस वर्षापासून कदम हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
१९८० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संपतराव चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे असलेले पतंगराव कदम हे केवळ ८९ मतांनी पराभूत झाले होते. मात्र १९८५ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून पतंगराव कदम हे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आमदार झाले. मात्र १९९५ ला अपक्ष उमेदवार स्वर्गीय संपतराव देशमुख यांनी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांना पराभूत केले. मात्र १९९६ साली संपतराव देशमुख यांचे दुखद निधन झाले. त्यांनंतर झालेल्या १९९६ च्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय संपतराव देशमुख यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांचा पराभव केला. मात्र त्यांनंतर १९९९ ते २०१८ पर्यंत पतंगराव कदम हे आमदार आहेत.
अनेक वेळा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कदम यांचं नाव आघाडीवर असायचं, मात्र मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली. मात्र निराश न होता, मिळालेल्या सर्व खात्यात त्यांनी उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.
COMMENTS