मुंबई – राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाला आहे. राज्याभरातील अनेक शेतक-यांचं या बोंडअळीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतक-यांचं हे नुकसान सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतक-यांना भरपाई मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल मोर्चा काढला. त्यानंतर कर्जमाफी आणि इतर शेतक-यांच्या मागण्यांसाठी 12 डिसेंबरला सर्व विरोधी पक्षांनी मिळून नागपुरात विधीमंडळावर मोर्चा काढला. या मोर्चानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोंडअळी आणि शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज दुपारी ही चर्चा होणार आहे.
शरद पवार हे रविवारी मुंबईत असून ते मुंबईतून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेद्वारे ते शेतक-यांची कर्जमाफी, बोंडअळीमुळे झालेले नुकसान अशा विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यासोबत बोलणार आहेत. तसेच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या चर्चेदरम्यान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या चर्चेनंतर या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतक-यांसाठी नक्कीच आनंदाची घोषणा होईल अशी आशा आता राज्यातील शेतक-यांना लागली आहे. त्यामुळे पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या होणा-या या चर्चेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS