मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या 50 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत हजारो मुलाखती दिल्या आहेत. मात्र पवारांची अशी एक मुलाखत आता होणार आहे. जी तुम्ही कधीच ऐकली नसेल, पाहिली नसेल….. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत.
येत्या 3 जानेवारीला पुण्यात बीएमसी कॉलेजच्या मैदानात ही ऐतिहासीक मुलाखत होणार आहे. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मुलाखत होणार आहे. खरंतर पवारांच्या याच विषयावरील प्रकट मुलाखती यापूर्वी झाल्या आहेत. मात्र त्यात नावीन्य असं काहीच नव्हतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करावं म्हणून गेले तीन महिने प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही नेत्यांच्या होकारानंतर या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं.
कवी आणि माजी आमदार रामदाद फुटाणे यांनी या मुलाखतीचं आयोजन केलं आहे. या मुलाखतीबाबत जेंव्हा राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली. तेंव्हा त्यांनी मला हवे ते प्रश्न मी त्यांना विचारेन आणि ते मान्य असेल तरच मी मुलाखत घेईन अशी अट राज यांनी टाकली होती. त्यानंतर पवारांची संपर्क साधून राज ठाकरेंच्या अटींविषयी सांगण्यात आलं. त्याला पवारांनी लागलीच होकार दिला. त्यामुळे आता ठाकरी प्रश्नांना शरद पवार तेवढीच अचूक उत्तरे देणार आहेत. शरद पवारांचा आणि राज ठाकरेंचा मोठा चाहता वर्ग राज्यात आहे. त्यामुळे या मुलाखतीबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे.
COMMENTS