मुंबई – औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले असल्याचं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं, असही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 8, 2020
दरम्यान कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी पायीच घराची वाट धरली आहे. या संकटातच औरंगाबादजवळील करमाड येथे तब्बल 16 मजुरांना मालगाडीने चिरडलं आहे. यात 16 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार असल्याची घोषणा केली आहे. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला. हे मजूर मध्य प्रदेशातील असल्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीदेखील याआधी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेला हा रेल्वे अपघात व्यथित करणारा आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून, ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य केलं जात असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
COMMENTS